Wednesday, January 14, 2009

विवेकानंद केंद्र

स्वामी विवेकानंदांचा जन्म १२ जानेवारी १८६३ ला झाला। काळ पुढे पुढे चालला होता । १२ जानेवारी १९६३ रोजी या घटनेस १०० वर्षे पुर्ण होत होती।दुर्दैवाने म्हणा किंवा योगायोगाने जी परिस्थिती स्वामीजींच्या जन्मावेळी होती तीच परिस्थिती ; १८६३ सालि सर्वत्र गोंधळ,उच्च समजल्या जाणाऱ्या शिकलेल्या समाजात स्वधर्म हीनतेची भावना,परंपरा व संस्कॄती बाबतीत उदासीनता तर १९६२ चीनच्या युध्दातील पराभवामुळे देशातील विचारवंतांची मती खुंटलेली, राष्ट्रीय मुल्ये तपासुन घ्यायची वेळ आलेली, स्वदेशाबाबत पुन:विचार करायला लावणारी,स्वत:च्या सरकार बद्दल अविश्वास,पण त्याचवेळी भारतात पुनरपि एक चैतन्याची लाट उसळली होती कारण होते स्वामी विवेकानंदांची जन्मशताब्दी ;
तेंव्हा काही विचारवंत मंडळी,रामकृष्ण मिशन व विवेकानंद प्रेमी एकत्र आली व त्यांच्या मनात आले कि; त्रिसागराने वेष्टित कन्याकुमारी येथील श्रीपादशिलेवर जेथे स्वामीजीना आपले जीवनध्येय सापडले त्या स्थानी एक सुंदर स्मारक उभे करावे। झाले! सारेजण उत्साहाने कामाला लागले. एक स्मारक समिती स्थापन करण्यात आली.निधी संकलन सुरु झाले. १२ जानेवारी १९६३ ह्या दिवशी श्रीपादशिलेवर स्मृतिशिला स्थापित करण्यात आली व त्यावर कोरण्यात आल - " ह्या ठिकाणी दि.२५ डिसेंबर १८९२ ते २७ डिसेंबर १८९२ ह्या काळात स्वामी विवेकानंदानी तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येअखेर स्वामीजीना आपले जीवितध्येय गवसले. "कोणत्याही चांगल्या कामात विघ्न आणणारे काही लोक समाजात असतातच मग इथे तरी अपवाद का? तेथील कांही स्थानिक म्हणजे जे धर्मांतरित झाले आहेत ,हिंदु धर्माचा त्याग करुन ख्रिस्ती धर्म स्विकारल आहे अश्या लोकांनी स्मारकाला तर विरोध केलाच पण त्या श्रीपादशिलेवर लावलेली स्मृतिशिला देखील काढून टाकली. आणि त्या श्रीपादशिलेवर सेंट झेवियर्स अशी पाटी लावली. ( सेंट झेवियर्स म्हणजे ज्याने केरळच्या व तामिळनाडु च्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर धर्मांतर घडवुन आणून ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला होता.)
मग त्यावर स्वामीजीविचार प्रेरित लोकांनी या परिस्थिती वर मात करण्यासाठी एक समितीच नेमली। पण त्याला एक खंबीर नेतॄत्वाची आवश्यकता होती. कारण जशी तिथल्या स्थानिक हिंदुविरोधी लोकांच विरोध होत तसेच कांही राजकारणीही या कार्याला विरोध करित होते.समितीच्या लोकांनी तत्कालीन संघाचे सरसंघसंचालक श्री. गोळवलकर गुरुजी यांची भेट घेतली व त्यांना या परिस्थितीची कल्पना दिली. तेंव्हा गुरुजी व समितीच्या लोकांमधे एक नाव आले ते नाव होते संघाचे सहकार्यवाह माननीय श्री एकनाथजी रानडे. एकनाथजी हे कुशल संघटक होते.त्यांनी आपले सारे जीवन राष्ट्रासाठी अर्पण केले होते. त्यांनी रा.स्व. संघासाठी बंगाल प्रांतात प्रदीर्घ काळ काम केले होते.स्वामीजी त्यांचे श्रद्धास्थानी होते.नुकतेच त्यांनी स्वामीजींच्या विचारांचा संग्रह ’ हिंदुतेजा जाग रे ’ हा स्वामीजींच्या विचारावर आधारित ग्रंथ प्रसिध्द केला होता. त्यामुळे एकनाथजींकडे या शिलास्मारकाची धुरा सोपवावी असा विचार गुरुजी व समितीच्या लोकांनी केला. या रितीने ११ ऑगष्ट १९६३ रोजी एकनाथजी विवेकानंद शिलास्मारकाचे संघटक सचिव झाले.
ते सामान्य माणसांपासुन ते राष्ट्रपतीपर्यंत सर्वांना भेटले।निधीसंकलनास त्यांनी सामान्य माणसाच्या १ रुपयापासुन सुरुवात केली पण कोणत्याही एखाद्या उद्योगपतीकडुन च सर्व खर्च मिळवुन काम लवकर संपवण्याची घाई केली नाही।त्यांनी सर्वसामान्य जनतेपासुन ते कोट्याधीश या सर्वांकडुन मिळुन दीड कोटी रुपयांचा निधी संकलन केला। मित्रांचा विरोध,परधर्मीयांची नाराजी,राजकीय असहकार,कायदेशीर अडचणी ,स्थानिक जनमताची स्वार्थी विरोध या सर्व समस्यांवर मात करीत एकनाथ जी नी शिलास्मारकाचे काम पुर्ण केले ते ही ठरवलेल्या कालावधीत कोठेही कामाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता। आज कन्याकुमारी येथे उभे असलेले स्मारक हे भारतीय स्थापत्य कलेतील एक महान आश्चर्य तसेच वास्तुशास्त्राचा आगळा-वेगळा अविष्कार मानला जातो।हे स्मारक ३ विभागात उभारले गेले आहे. १- देवी पार्वतीने उभ्याने तपश्चर्या केल्यामुळे ज्या शिलेवर तिच्या पायाचा ठसा उमटला ,त्यावर मंदिर उभारुन त्याचे जतन केले आहे. २-दुसरा स्वामी विवेकानंद यांचा अखंड पुतळा आणि तिसरा स्वामीजींना अभिप्रेत असलेले ॐ कार प्रतिकासह ध्यान मंदिर .हे स्मारक २ सप्टेंबर १९७० रोजी तत्कालीन राष्ट्रपतींच्या उपस्थितीत रामकृष्ण मठाच्या अध्यक्ष्यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आले. लक्ष्यावधी विदेशी व देशी पर्यटक स्मारकाला भेट देवुन विवेकानंद विचारांनी प्रेरित होतात. दगडमातीचे स्मारक राष्ट्र पुनुरुत्त्थानाला पुरे पडत नसते.विवेकानंद केंद्र स्थापनेमागे हाच विचार एकनाथजी यांच्या मनात होता. विवेकानंद केंद्राबद्दल चे विचार स्वत: एकनाथजींनीच सांगितलेले आहे.
१) अध्यात्मिक तत्वावर सर्व समावेशक अशी शिक्षण पद्धती देशात चालु केलि पाहिजे. यासाठी एका संघटनेचीए गरज आहे. हिंदुंच्याबरोबर इतर ,धर्म,जाते, पंथ यांच्या शिकवऊन्कितील समविचारांचे शिक्षण देण्यासाठी एका पवित्र उपासना मंदिराची स्थापना आवश्यक आहे .
२) पावित्र्यपुर्ण जीवनाचा आदर्श ठेवलेले, ईश्वरावर निस्सीम श्रद्धा असणारे,पराक्रमी शेकडो सहस्त्र तरुण-तरूणी ,गरीब व दीन-दुबळ्या दलित समाजाच्या उत्कर्षाप्रत नेण्यासाठी सहानभुतीपुर्वक सहाय्य करीत,साऱ्या देशभर संचार करतील,तसेच समाजाला त्याच्या मुक्तिचे ,मदतीचे,सामाजिक पुनुरुत्थ्यानाचे व समतेचे तत्वज्ञान शिकवतील
विवेकानंद केंद्राची स्थापना -
स्वमीजींचे ’मानवसेवा हीच माधवसेवा ’ हे तत्व आपले अंतिम ध्येय समजुन विवेकानंद केंद्राची स्थापना ७ जानेवारी १९७० रोजी कन्याकुमारी येथे करण्यात आली। केंद्र कार्यासाठी ३० वर्षापर्यंतच्या अविवाहित ,पदवीधर तरुण-तरुणींची ’ जीवनव्रती ’ म्हणुन निवड केली जाते. पहिल्यावर्षी त्यांना सेवाकार्याचे प्रशिक्षण देऊन नंतर पुढची ३ वर्षे प्रत्यक्ष कार्यनुभवासाठी ,केंद्राची कामे सुरु असलेल्या मागास आदिवासी भागात पाठवण्यात येते. या जीवनाव्रतींच्या उदरनिर्वाहाचे उत्तरदायित्व केंद्राकडे असते. पण या कार्यकर्त्याना साध्या राहणीमानात वावरण्याची तयारी ठेवावी लागते. जीवनाव्रतींच्या मदतीला समाजाचे ऋण मानणारे स्थानिक कार्यकर्ते असतात. शिवाय सेवाकार्येच्छु मध्यमवर्गीयानाही केंद्राच्या कामात सहभागी होता येतो.
केंद्र्कार्य पध्दती :
अ - कन्याकुमारी। कन्याकुमारी येथील विवेकानंदपुरम या सुमारे १०० एकर परिसरात केंद्राचे मुख्य कार्यालय आहे. तिथे निवडलेल्या जीवनाव्रतींना शिक्षण दिले जाते. तसेच योग व अध्यात्मिक साधना शिबीरांचे वर्गही चालु असतात. त्यात भारतीयांबरोबर परदेशी नागरिक ही मोठ्या प्रमाणात असतात.
विवेकानंद शिलास्मारकातर्फे येथे पर्यटकांना बँक,दवाखाना,ग्रंथालय , होटेल्स आदि सुविधा अत्यंत माफ़क दरात केली जाते. स्वामीजींच्या परिवाज्रक अवस्थेतील घटनांवर आधारित एक कायमस्वरुपी चित्रप्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधुन घेते. स्थानिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय म्हणुन केंद्रातर्फे मॅट्रिक पर्यंत एक शाळा चालवली जाते.
ब) शिक्षण - ’ माणसातील पुर्णत्वाचे प्रगटीकरण म्हणजे शिक्षण ’ या स्वामिजीनी सांगितलेल्या तत्वावर अरुणाचल प्रदेशात गुरुकुल पध्दतीने केंद्राच्या शाळातुन त्या दुर्गम भागातील मुलांना शिक्षण सोयी पुरविण्यात येतात। या शिवाय इतर राज्यातही भारतीय संस्कृतीवर आधारित गुणवत्ता वाढीस लागणारे शिक्षण दिले जाते।

योग व योगोपचार - केंद्राच्या भारतातील सुमारे शाखेतुन समाजातील निरनिराळ्या स्तरावरील व्यक्त्तीसाठी योगाचे वर्ग घेतले जातात. याबरोबरच प्राणायाम , ॐ कार ध्यान वर्ग आदि घेतले जातात. तसेच दरवर्षी विभागीय स्तरावर योग शिक्षा व योग शिक्षक वर्ग घेतले जातात.
ग्रामीण विकास कार्यक्रम - खेड्यापाड्यातील समाजाच्या उन्नतीसाठी केंद्राने विविध राज्यांमधे विशेषत: आसाम, ओरिसा, अरूणाचल प्रदेश ,कन्याकुमारी येथे बालगाथा,संस्कार वर्ग,सकस आहार, दीपपुजा ,सांस्कृतीक केंद्र ,नेत्र चिकित्सालय या शिवाय - स्त्रियांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडेल असे शिक्षण दिले जाते आर्थिक विकासाचे कार्यक्रम ,औद्योगिक शिक्षण ,पिण्याचे पाण्यासाठीचे प्रकल्प याकडे अधिक लक्ष दिले जाते

नैसर्गिक साधन-संपत्ती विकास प्रकल्प - मानवी जीवनाचा निसर्गाशी संवाद साधण्यासाठी अनेक कामे हाते घेण्यात आली असुन प्रामुख्याने- नैसर्गिक उर्जेचा शोध व प्रसार,बायोगॅस,गोबरगॅस,अपारंपारिक उर्जेचा वापर,खेड्यातील लोकांसाठी कमी खर्चात घरे ,धुररहित चुली आदि चालु आहेत. निरनिराळे पथनाट्यांद्वारे समाजाला पर्यावरणाची जाणिव करुन देणे तसेच पाण्याचा योग्य वापर व स्वच्छता ह्या गोष्टी लक्षात आणुन दिल्या जातात.

प्रकाशन विभाग - केंद्राच्या मद्रास, पुणे आदि प्रकाशन विभागातर्फे मासिके,पुस्तके,भित्तीपत्रके ,शुभेच्छापत्रे ,दैनंदिनी, स्वामींजींचे विचार, भाषणे,पत्रे आदि प्रकाशित केले जाते.
केंद्राच्या शाखा- सध्या भारतातील राज्यात केंद्राच्या ७० शाखा काम करत आहेत. योगवर्ग,शाळा-कॉलेज मधुन विविध स्पर्धा घेणे ,अभ्यासवर्ग घेणे,स्वामीजींच्या विचाराचे प्रसार करणे या साठी विविध मान्यवरांची भाषणे आयोजित करणे आदि कामे स्थानिक शाखेतर्फे केली जातात.
विशेष प्रकल्प - आपल्या सांस्कृतीक परंपरांचे जतन आणि मानवतेची सेवा ही उद्दिष्टे ठेवुन अरुणाचल प्रदेशात ’ अरूण ज्योती ’ प्रकल्पाचे आयोजन , तसेच कलकत्ता इथे कॅन्सर रुग्णालय, गुवाहाटी इथे ’विवेकानंद केंद्र ’ हे सांस्कृतीक संस्थेचे कार्य सुरु आहे. ईशान्य भारतातील सांस्कृतीक परंपरांचा धागा कायम टिकवणे ,परस्परांत सामंजस्य वाढवुन त्यांच्यात एकात्मता वाढीला लावण्याच्या दृष्टीने हे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
याशिवाय - महाराष्ट्रातील नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर जवळ ५ किमी अंतरावर असलेल्या पिंपळद या गावी विभागीय प्रशिक्षण प्रकल्प सुरु करण्यात आला आहे। याच ठिकाणी त्या भागातील वनवासी विद्यार्थ्यांसाठी विवेकाश्रम हे वसतीगृह सुरु करण्यात आले आहे. हे विद्यार्थी विवेकाश्रमात राहुन जवळ असलेल्या शाळेत जातात. या विद्यार्थ्यांना वर्षभर निवास, भोजन,लेखन व इतर शालेपयोगी साहित्य विनामुल्य उपलब्द करुन दिले जातात.
ज्या विद्यार्थ्यांना सुट्टीमध्ये समाजकार्याची इच्छा असते , आवड आहे असे विद्यार्थी या प्रकल्पात २-३ महिने काम करु शकतात.तशी व्यवस्था या प्रकल्पात आहे.

या सर्व कार्यांसाठी पैसे कुठुन येतात?
(लाखमोलाचा प्रश्न आहे हा ) भारताच्या सर्व भागातील विवेकानंद केंद्र्पेमी मंडळीकडुन मिळालेल्या देणग्यातुन हे सर्व खर्च भागवले जाते. विकासाच्या काही योजनांसाठी उद्योजकांकडुनही मदत मिळते.या शिवाय केंद्राच्या प्रकाशनातील जाहिरातींमधुन ही काही प्रमाणात निधी उपलब्द होत असतो.